देशभरात विविध ठिकाणी होळीचा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे. आज धुलीवंदन देखील उत्साहात साजरे होत असल्याचं पाहायला मिळत आहे. मात्र, होळीच्या आधी रंग लावण्यास नकार दिल्याने तीन जणांनी एका २५ वर्षीय तरुणाचा गळा दाबून खून केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. राजस्थानमधील दौसा जिल्ह्यात ही घटना घडली आहे.
ही घटना बुधवारी सायंकाळी रालावस गावात घडली. रालवास गावातील रहिवासी अशोक, बबलू आणि कालूराम हे हंसराज नावाच्या व्यक्तीला रंग लावण्यासाठी त्याच्याकडे एका स्थानिक ग्रंथालयात गेले होते. हंसराज हा स्पर्धा परीक्षेची तयारी करत होता. पण तेथे गेल्यानंतर हंसराजने रंग लावून घेण्यास नकार दिला. याचा राग आल्याने अशोक, बबलू आणि कालूराम यांनी हंसराजला लाथाबुक्यांनी आणि बेल्टने मारहाण केली. त्यानंतर या तिघांपैकी एका आरोपीने हंसराजचा गळा दाबून हत्या केली, अशी माहिती अतिरिक्त पोलीस अधीक्षक दिनेश अग्रवाल यांनी यांनी दिली आहे.
दरम्यान, मृताच्या कुटुंबातील सदस्यांनी आणि ग्रामस्थांनी हंसराजचा मृतदेह घेऊन निषेध करत आंदोलन केलं. गुरुवारी पहाटे १ वाजेपर्यंत परिसरातील राष्ट्रीय महामार्ग रोखला होता. हंसराजच्या कुटुंबाला ५० लाख रुपये भरपाई तसेच त्यांच्या कुटुंबातील एका सदस्याला सरकारी नोकरी आणि आरोपी तिघांना तात्काळ अटक करण्याची मागणी आंदोलकांनी केली. यानंतर पोलिसांच्या आश्वासनानंतर अखेर आंदोलकांनी आंदोलन मागे घेतलं