‘पोन्नियन सेलवन 2’ च्या ‘वीरा राजा वीरा’ या गाण्यावरून लोकप्रिय संगीतकार एआर रहमान आणि प्रोडक्शन कंपनी मद्रास टॉकीज वादाच्या भोवऱ्यात अडकले आहेत. त्यांच्यावर कॉपीराइटचे आरोप करण्यात आले आहेत आणि त्यावर सुनावणी करताना दिल्ली हायकोर्टानं संगीतकारला २ कोटी देण्याचे आदेश दिले आहेत. गायक फैयाज वसीफुद्दीन डागर यांनी कॉपीराइट संबंधीत ही याचिका दाखल केली होती आणि त्या प्रकरणात हा निर्णय आला आहे. कोर्टानं आदेश दिले आहेत की ही रक्कम कोर्टाच्या रजिस्ट्रार ऑफिसमध्ये जमा करण्यात यावी.
पद्म श्री अवॉर्डनं सन्मानित भारतीय शास्त्रीय गायक फैयाज वसीफुद्दीन डागर यांनी 2023 मध्ये कोर्टाचे दरवाजे ठोठावत आरोप केला की हे गाणं त्यांचे वडील नासिर फैयाजुद्दीन डागर आणि काका जहीरुद्दीन डागरच्या ‘शिव स्तुति’ मधून कॉपी करण्यात आलं आहे. त्यांनी एआर रहमान आणि मद्रास टॉकीजसोबत इतर गाण्यांच्या वापरावर बंदी आणण्याची मागणी केली आहे.
न्यायमूर्ती प्रतिभा एम. सिंह यांनी फैयाज डागर यांच्या या अंतरिम याचिकेवर सुनावणी केली. त्यावेळी त्यांनी सांगितलं की ‘वीरा राजा वीरा’ हे गाणं केवळ ‘शिव स्तुती’वर आधारित आणि प्रेरित नाही तर काही बदलांसह त्याच्यासारखेच आहे. न्यायालयाने ए.आर. रहमान आणि मद्रास टॉकीजला रजिस्ट्रीमध्ये २ कोटी रुपये जमा करण्याचे आदेश दिले आहेत. न्यायालयाच्या हे लक्षात आले की संगीतकार आणि निर्मिती कंपनीनं ज्युनियर डागर बंधूंना गाणे तयार करण्याचे कोणतेही श्रेय दिले नव्हते. त्यामुळे, चित्रपट निर्मात्याला ऑनलाइन प्लॅटफॉर्मवर चित्रपटात हे क्रेडिट्स जोडण्याचे आदेश देण्यात आले आहेत. याशिवाय, प्रतिवादींना 2 लाख रुपयांचा दंडही ठोठावण्यात आला आहे.