गुजरातमधील जामनगर येथे जॅग्वार जेट अपघातात मृत्युमुखी पडलेले भारतीय हवाई दलाचे फ्लाइट लेफ्टनंट सिद्धार्थ यादव यांचे शुक्रवारी हरियाणामधील त्यांच्या मूळ गावी लष्करी इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी हजारो स्थानिक लोक, भारतीय हवाई दलाचे अधिकारी, सशस्त्र दलाचे सदस्य, पोलीस अधिकारी आणि राजकीय नेते यादव यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी जमले होते. त्यांच्या कुटुंबातील सदस्यांनी त्यांना साश्रू नयनांनी त्यांना निरोप दिला. यावेळी वैमानिकाचं जिच्याशी लग्न ठरलं होतं तीही हमसून रडताना दिसली.
“मला त्याचा चेहरा दाखवा…मला पुन्हा एकदा त्याचा चेहरा पाहू द्या”, असं म्हणत तिने मृतदेहाजवळ हंबरडा फोडला. हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. मृतदेहाजवळ उभ्या असलेल्या सानिया यांना अश्रू अनावर झाले होते. त्या म्हणाल्या, बेबी, तू मला घ्यायला आली नाहीस, तू मला वचन दिले होतेस. दुसऱ्या एका व्हिडिओमध्ये, सानिया म्हणाल्या की तिच्यापेक्षा कोणतीही मुलगी अभिमानी असू शकत नाही. घटनेच्या फक्त १० दिवस आधी यादव आणि सानिया यांचा साखरपुडा झाला होता. २ नोव्हेंबर रोजी त्यांचे लग्न होणार होते.
हरियाणाच्या रेवाडी येथील रहिवासी असलेले यादव यांचे जॅग्वार लढाऊ विमान जामनगर हवाई दलाच्या तळावरून उड्डाण केल्यानंतर काही वेळातच तांत्रिक बिघाडामुळे कोसळून त्यांचा मृत्यू झाला. त्यांचे सहकारी मनोज कुमार सिंग जखमी झाले आणि सध्या त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.








