धुलीवंदनाचा सण आज साजरा केला जात आहे. तसेच प्रत्येक आठवड्यातील शुक्रवारी (जुम्मा) बहुसंख्य मुस्लीम लोक सामूहिक नमाज पठण करतात. अशा वेळी हिंदू व मुस्लीम समुदायांमधील लोक आपापले उत्सव साजरे करण्यासाठी आमनेसामने आले तर तणाव निर्माण होऊ नये म्हणून देशभर चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. उत्तर प्रदेशमधील संभलसारख्या ठिकाणी पोलिसांनी अधिक फौजफाटा तैनात केला आहे. उत्तर भारतात हिंदू समुदायातील लोक धुलीवंदनाच्या दिवशी अनेक ठिकाणी मिरवणुका काढतात. मात्र, यावेळी संभलमध्ये अशा मिरवणुका दिवसभर काढता येणार नाहीत.
संभलचे पोलीस अधीक्षक के. के. बिश्नोई यांनी नागरिकांना संबोधित करताना सांगितलं की शहरात सर्व ठिकाणी मिरवणुका काढण्यास परवानगी देण्यात आली आहे. मात्र, या मिरवणुका दुपारी २.३० वाजण्याच्या आत पूर्ण कराव्यात. दुपारी २.३० नंतर नमाज पठणास परवानी देण्यात आली आहे.
के. के. बिश्नोई म्हणाले, “होळीसाठी मिरवणुका काढण्याची परवानगी आहे. शहराच्या सर्व भागात होळी साजरी केली जाईल. लोकांनी दुपारी अडीच वाजेपर्यंत होळी साजरी करावी. त्यासाठी चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. मला आशा आहे की ही होळी सर्वांना आनंद देईल. मात्र दुपारी, अडीचनंतर शुक्रवारची नमाज (जुम्म्याची नमाज) अदा करण्यासाठी परवानगी देण्यात आली आहे.”