मध्य रेल्वेने एका नव्या बदलासंदर्भातील निर्णय घेतला असून त्याबद्दलचे रचनात्मक बदलही करण्यात आले आहेत. या निर्णायचा फायदा ज्येष्ठ नागरिकांना होणार आहेत. रेल्वेने प्रवास आरामदायी होण्यासाठी लोकलचा मालडबा ज्येष्ठ नागरिकांसाठी खुला करण्यात आला आहे. मध्य रेल्वेने माटुंगा कारखान्यात लोकलच्या मालडब्यात बदल करून, ज्येष्ठ नागरिकांसाठी स्वतंत्र आकर्षक डबा तयार झाला आहे.
मध्य रेल्वेवरील प्रत्येक लोकलमध्ये प्रवाशांची प्रचंड गर्दी असते. लोकलमध्ये प्रथम श्रेणी, द्वितीय श्रेणी असे डब्याचे प्रकार आहेत. तर, महिला, दिव्यांग आणि मालवाहतुकीसाठी स्वतंत्र डबे आहेत. गरोदर स्त्रियांना आणि ज्येष्ठ नागरिकांना लोकलच्या डब्यात काही आसने राखीव आहेत. मात्र, ज्येष्ठ नागरिकांना गर्दीतून प्रवास करणे कठीण होते. लोकलमधील गर्दीचा विचार करता ज्येष्ठ नागरिकांना त्यांच्या राखीव आसनापर्यंत पोहोचणे अशक्य होते. त्यामुळे मध्य रेल्वेने लोकलच्या माल डब्यात बदल करून ज्येष्ठ नागरिकांसाठी स्वतंत्र डबा तयार केला आहे. त्यामुळे पहिला लोकल रेक तयार झाला असून येत्या काळात मध्य रेल्वेवरील सर्व रेकमध्ये बदल करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे.