भारत आणि पाकिस्तान या दोन्ही राष्ट्रांमध्ये तणाव वाढला असून, सीमाभागात भारताच्या ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तानच्या बाजूनही या कारवाईचा निषेध करत प्रत्युत्तराची कारवाई करण्यात आली. मात्र भारताच्या संरक्षण दलाच्या अभेद्य कवचापुढं पाकचे हे सर्व प्रयत्न फोल ठरले. पाकिस्ताननं एकामागून एक ड्रोन हल्ले करण्याचा प्रयत्न करुनही भारतानं या प्रत्येक प्रयत्नाचा समूळ नायनाट केला.
८ आणि ९ मे रोजी मध्यरात्री पाकिस्तानी सशस्त्र दलांनी संपूर्ण पश्चिम सीमेवर ड्रोन आणि इतर शस्त्रसामग्रीचा वापर करून अनेक हल्ले केले. जम्मू आणि काश्मीरमध्ये नियंत्रण रेषेवर पाकिस्तानी सैन्याने अनेक वेळा शस्त्रसंधीचे उल्लंघनही केलं. यावेळी हे सर्व ड्रोन हल्ले प्रभावीपणे परतवून लावण्यात आले आणि सीएफव्हींना योग्य उत्तर देण्यात आल्याची माहिती भारतीय सैन्यदलानं एक व्हिडीओ जारी करत स्पष्ट केलं. भारतीय सैन्य देशाच्या सार्वभौमत्वाचं आणि प्रादेशिक अखंडतेचं रक्षण करण्यास वचनबद्ध आहे असं म्हणत सैन्यदलानं पाकिस्तानच्या सर्व नापाक योजनांना सडेतोड उत्तर दिलं जाईल अशी हमीसुद्धा दिली. अवघ्या 14 सेकंदांच्या या व्हिडीओमध्ये ड्रोन, अचूक लक्ष्यभेद आणि त्यानंतर होणारा स्फोट अशी दृश्य या व्हिडीओमध्ये पाहायला मिळत आहे.