भारतीय सीमा ओलांडून गेलेल्या भारतीय सैनिकाला पाकिस्तानने परत पाठवलं

भारत-पाकिस्तानची अंतरराष्ट्रीय सीमा चुकून ओलांडून गेलेले भारतीय सुरक्षा दलाचे कॉन्स्टेबल पुरनम कुमार शॉ यांना पाकिस्तानने भारताकडे सोपवलं आहे. 23 एप्रिल रोजी पुरनम कुमार हे गस्त घालत असतानाच अंतरराष्ट्रीय सीमा ओलांडून पाकिस्तानच्या सीमेत गेले होते. तब्बल 20 दिवसानंतर पाकिस्तानने पीके सिंग यांना भारताकडे परत सोपवलं आहे. सकाळी साडेदहा वाजता पुरनम कुमार यांना भारताच्या ताब्यात सोपवण्यात आलं आणि त्यासंदर्भातील कागदोपत्री पूर्तता पूर्ण करण्यात आल्या. 22 एप्रिल रोजी पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या दुसऱ्या दिवशीच हा प्रकार घडला होता. मागील 20 दिववसांमध्ये दोन्ही देशातील संबंध या दहशतवादी हल्ल्यामुळे कमालीचे ताणले गेले असतानाच पाकिस्तानने पी. के. सिंग यांना मायदेशी परत पाठवलं आहे.

पुरनम कुमार यांना सुरक्षितपणे परत आणण्यासाठी दोन्ही देशांच्या सीमा दलांमध्ये हा प्रकार घडल्यानंतरच्या दिवसापासूनच संवाद सुरु होता. अशाप्रकारे एखाद्या सैनिकाने चुकून सीमा ओलांडून जाणं ही सामान्य बाब आहे. यापूर्वीही दोन्ही बाजूने असं घडलं असून अनेकदा अशा सैनिकांना मायदेशी परत पाठवलं जातं, असं अधिकाऱ्यांनी नमूद केलं होतं. मात्र आता पहलगाम प्रकरणानंतर दोन्ही देशांमधील संबंध तापलेले असल्याने पीके सिंग यांची सुटका कधी होते याबाबत साशंकता होती. मात्र या जवानाला पुन्हा भारताच्या ताब्यात देण्यात आल्याची माहिती बीएसएफने पत्रक जारी करुन दिली आहे. वाघा-अटारी सीमेरेषेवर पुरनम कुमार यांना भारताकडे सोपवण्यात आल्याचं बीएसएफने पत्रकात म्हटलं आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here