मोदी ट्रम्प भेट.. शेजारील देशांचा इलाज थेट

आंतरराष्ट्रीय स्तरावर एक महत्त्वाची भेट झाली.. ज्या भेटीकडे सगळ्या जगाचं लक्ष लागलं होतं.. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची अमेरिकेत व्हाइट हाऊसमध्ये भेट झाली. उत्साहाने दोघांनी एकमेकांची भेट घेतली.
ट्रम्प यांनी वी मिस्ड यू अ लॉट असे म्हणत मोदी यांना दिलेल्या आलिंगनाची चर्चा आहे.भेटीनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही पोस्ट करत माहिती दिली. MIGA आणि MAGA एकत्रितपणे समृद्धीसाठी एक मोठे भागीदार बनलेत अशी पोस्ट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली.
भारत MIGA (मेक इंडिया ग्रेट अगेन) कडे वाटचाल करत आहे, जे MAGA (मेक अमेरिका ग्रेट अगेन) चे त्यांचे रूप आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी यावेळी पंतप्रधान मोदींचे भरभरून कौतुक केलं.. पंतप्रधान मोदी भारतात चांगले काम करत आहेत. जागतिक स्तरावरील समस्यांवर तोडगा काढण्यात ते माझ्यापेक्षा श्रेष्ठ आहेत. त्यांच्यात आणि माझ्यात कोणतीही स्पर्धा नाही. माझ्याहून ते खूप चांगले आहेत. विकासाच्या आणि प्रगतीच्या वाटेवरचे सहप्रवासी असल्याची पोच पावती डोनाल्ड ट्रम्प यांनी अवर जर्नी टुगेदर हे पुस्तक देऊन केली.
चर्चे दरम्यान चे काही व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत आणि त्यांची बरीच चर्चा आहे.. यावेळी या चर्चेला सुरुवात होण्याआधी स्वतः डोनाल्ड ट्रम्प यांनी आदरपूर्वक नरेंद्र मोदी यांना बसायला खुर्ची दिली. त्यांच्या या कृतीमुळे जगभरात चर्चा होऊ लागली आहे. राष्ट्राध्यक्षपद हे जगातील सर्वात शक्तिशाली पद मानले जाते, परंतु ट्रम्प यांनी मोदींसाठी दाखवलेला हा सन्मान भारतीयांसाठी अभिमानास्पद क्षण ठरला. स्वाक्षरीच्या वेळीही ट्रम्प मोदींच्या मागे उभे राहून त्यांचा सन्मान करत होते. आंतरराष्ट्रीय स्तरावरचे असे क्षण खूप काही सांगणारे असतात.


या भेटीदरम्यान दोघांमध्ये अनेक महत्त्वाच्या विषयांवर चर्चा झाली. ट्रम्प यांनी मोदींसोबत भविष्यातही मजबूत संबंध ठेवण्याची इच्छा व्यक्त केली. त्यांच्या या भेटीमुळे पुन्हा एकदा भारत-अमेरिका मैत्रीचे नवे पर्व सुरू झाल्याची भावना व्यक्त केली जात आहे. ट्रम्प आणि मोदी यांची मैत्री केवळ दोन देशांमधील संबंधांपुरती मर्यादित नाही, तर ती जागतिक राजकारणातही मैत्रीचे एक अनोखे उदाहरण आहे. अदानी प्रकरण, रशिया युक्रेन युद्ध, बांगलादेश प्रश्न, भारत चीन सीमावाद, अमेरिकेने लादलेला आयातकर अशा अनेक महत्त्वाच्या प्रश्नांवर चर्चा झाली.

भेटी दरम्यानचे महत्त्वाचे मुद्दे


अदानी समूहाच्या प्रकरणावर चर्चा झाली का? असा प्रश्न एका पत्रकाराने विचारला.. असे व्यक्तिगत प्रश्न राष्ट्रप्रमुखांच्या चर्चेत येत नसतात..भारतात लोकशाही आहे. वसुधैव कुटुंबकम ही आमची संस्कृती आहे प्रत्येक भारतीय माझा आहे यावर माझा विश्वास आहे पण असे व्यक्तिगत प्रश्न मुद्दे राष्ट्रप्रमुखांच्या चर्चेत येत नसतात तर व्यापक चर्चा होत असते असं ते म्हणाले..

कर आकारणी हा एक महत्त्वाचा मुद्दा होता.. पण मोदी यांच्या भेटीनंतर ट्रम्प यांनी संयमी भूमिका घेतली आहे. दोन्ही देशातील आयात निर्यातीला सोयिस्कर कर ठेवण्याबाबत महत्त्वपूर्ण चर्चा झालीय..


ट्रम्प यांनी २००८ 26/11 च्या मुंबई दहशतवादी हल्ल्यातील दोषी तहव्वुर राणा याला भारतात न्यायाला सामोरे जाण्यासाठी प्रत्यार्पणाला मान्यता दिली. भारताला मिळालेला हा फार मोठा राजनैतिक विजय असल्याचा दावा केला जातोय.. या दहशतवाद्याला भारताच्या हवाली करण्याची घोषणा करून अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी भारताचा विश्वास संपादन केल्याचं दिसतं..

रशिया-युक्रेन युद्धाबद्दल ट्रम्प यांनी घेतलेल्या पुढाकाराबद्दलही नरेंद्र मोदी यांनी भाष्य केले. भारत शांततेच्या बाजूने उभा असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. “जगाला वाटते की भारत तटस्थ आहे, परंतु भारत तटस्थ नाही. भारताची स्वतःची भूमिका आहे, ती शांतता आहे,” असे नरेंद्र मोदी म्हणाले.


ट्रम्प यांनी भारत आणि चीनमधील एलएसीवरील दीर्घकालीन सीमा प्रश्न सोडवण्यासाठी मध्यस्थी करण्यासाठी पुढाकार दर्शवला आहे. “जर मी मदत करू शकलो तर मला मदत करायला आवडेल, कारण ते थांबवले पाहिजे. ते खूपच हिंसक आहे,” असे ट्रम्प म्हणाले.

संरक्षण क्षेत्राच्या दृष्टीने महत्त्वाची चर्चा झाली असून त्यामुळे चीन-पाकिस्तानची झोप उडाली आहे.. अमेरिका भारताला जगातील सर्वात खतरनाक स्टेल्थ फायटर जेट F-35 देण्यास तयार आहे. अमेरिकेच्या या ऑफरमुळे चीन-पाकिस्तानात अस्वस्थतता निर्माण झाली आहे. ही डील पुढे सरकल्यास इंडियन एअर फोर्सची ताकद कैकपटीने वाढेल. संपूर्ण आशिया खंडात सैन्य संतुलन बदलणारा हा निर्णय आहे. अमेरिकेच्या सैन्य शक्तीमध्ये या विमानाची महत्त्वाची भूमिका आहे. जगातील फक्त तीन देशांकडे अमेरिका, चीन आणि रशिया यांच्याकडे स्टेल्थ टेक्नोलॉजीच फायटर विमान आहे. पाकिस्तानने चीनकडून अत्याधुनिक फायटर जेट्स विकत घेण्याची योजना बनवली आहे. त्यामुळे भारतासमोरील रणनितीक आव्हानं वाढत आहेत. F-35 ची ताकद चीन-पाकिस्तानकडे असलेल्या फायटर विमानांपेक्षा कैकपटीने अधिक आहे. म्हणूनच भारताला मिळालेली ही ऑफर ऐकून चीन-पाकिस्तानच टेन्शन वाढलं आहे.

सध्या चर्चेत असलेला मुद्दा म्हणजे अमेरिकेत राहणारे बेकायदेशीर भारतीय नागरिक .. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अमेरिकेच्या दौऱ्यात मानवी तस्करीला आळा घालण्यासाठी ठोस उपाययोजना करण्याची गरज व्यक्त केली. जर भारतीय बेकायदेशीरपणे अमेरिकेत राहत असतील तर त्यांना भारत त्यांना परत घेईल. भारत आणि अमेरिकेनं मानवी तस्करीची संपूर्ण व्यवस्था नष्ट करण्यासाठी प्रयत्न करायला हवेत. या व्यवस्थेविरोधात आपला सर्वात मोठा लढा आहे. ट्रम्प ही व्यवस्था नष्ट करण्यासाठी आम्हाला संपूर्ण सहकार्य करतील, असा विश्वास आहे.” असं पंतप्रधान मोदी म्हणाले..

एकूणच ही भेट सकारात्मक होती. ट्रम्प यांचा उद्देश खूप क्लिअर आहे.. अमेरिका सर्वप्रथम हा त्यांचा उद्देश आहे. पुढच्या 4 वर्षात त्यांना जे करायचं आहे त्याचा रोड मॅप समोर आहे. चांगली गोष्ट म्हणजे नरेंद्र मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांचं परराष्ट्र धोरण हे व्यवहारवादी आहे. दोन्ही देश एकमेकांना स्पर्धक म्हणून नाही तर भागीदार म्हणून बघत आहेत. हे संबंध दीर्घकाळासाठी आहेत. मोदी ट्रम्प यांची ही भेट त्यांचे मैत्रीपूर्ण संबंध हे एका नव्या पर्वाची नांदी आहे हे मात्र नक्की.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here