येत्या दोन दिवसात जोरदार पाऊस! हवामान विभागाने जारी केला अलर्ट

महाराष्ट्रातील काही भागात येत्या दोन दिवसात म्हणजेच ८ जुलैपर्यंत पावसाचा जोर वाढण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.कोकण आणि घाट परिसर तसेच पुणे आणि सातारा घाट परिसरात रविवार (६ जुलै) आणि सोमवार (७ जुलै) रोजी अतितीव्र मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. यासाठी ‘रेड अलर्ट’ जारी करण्यात आला आहे. कोकणातील रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांमध्ये रविवारी आणि सोमवारी ‘ऑरेंज अलर्ट’ देण्यात आला आहे, तर मुंबईत ‘यलो अलर्ट’ आणि ठाणे तसेच पालघरला ‘ऑरेंज अलर्ट’ जारी करण्यात आला आहे.

पश्चिम बंगालच्या गंगेच्या खोऱ्यात आणि लगतच्या भागात हवेच्या वरच्या थरात चक्रीय वातावरण निर्माण झाले आहे. गुजरातपासून पश्चिम बंगालच्या उत्तर भागापर्यंत द्रोणीय स्थिती (ट्रफ लाइन) तयार झाली आहे, जी मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि झारखंड या राज्यांवर परिणाम करत आहे. याशिवाय, महाराष्ट्र आणि कर्नाटकच्या किनारपट्टीवरही द्रोणीय स्थिती निर्माण झाली आहे. ही प्रणाली पश्चिमेकडे सरकत असल्याने महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. प्रादेशिक हवामान विभागाने यासंदर्भात माहिती दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here